By  
on  

'रात्रीस खेळ चाले 2' मधील हा अभिनेता आता या नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील 'दत्ता' हे पात्र साकारणाला कलाकार म्हणजे अभिनेता सुहास शिरसाट. सुहास लवकरच 'पांडु' या आगामी मराठी वेबसिरीजमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या मराठी वेबसिरीज प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी होत आहेत. यामध्ये 'एमएक्स प्लेयर' या ऑनलाईन विश्वातील लोकप्रिय कंपनीने सुद्धा पाउल टाकले आहे. 'एमएक्स प्लेयर' पहिलीवहिली मराठी वेबसिरीज 'आणि काय हवं'ला अमाप लोकप्रियता मिळाली. उमेश कामत-प्रिया बापटची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला 'एमएक्स प्लेयर' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, दोन नवीन भन्नाट मराठी ओरिजनल्स वेबसिरीज. 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या दोन्ही वेबसिरीजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून, या वेबसिरीज २० सप्टेंबरपासून आपल्याला एमएक्स प्लेयरवर विनामूल्य बघता येणार आहेत.

 

अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपले शहर सुरक्षित राहावे, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक सारंग साठे सांगतात, "मुंबई सारख्या मोठ्या शहराचे रक्षण करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे हे व्रत आचरणात आणावे लागते. मुंबईसारख्या शहराचे रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावे लागते. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात.  ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचे जीवन कसे असते, याचे दर्शन घडते. सरतेशेवटी पोलीस सुद्धा तुमच्याआमच्या सारखा एक माणूसच आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या आयुष्याचा आढावा अतिशय रंजक पद्धतीने या वेबसिरीजच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. '' 

येत्या २० सप्टेंबर पासून ही वेबसिरीज 'एमएक्स प्लेयर' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive