बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित मराठी चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला पहिला टीझर या मनोरंजनाची हमी देतो.
या टीझरमध्ये लग्नापूर्वी करण्यात येणारे चित्रीकरण, त्याची छोटेखानी फिल्म, संगीत सोहळा आणि तत्सम योजना यांची झलक पाहायला मिळते. चित्रपटाची उच्च मनोरंजन मूल्येच या टीझरच्या माध्यमातून समोर येतात. मराठीतील आघाडीचे आणि कसदार अभिनेते, त्यांना मिळालेली तेवढीच सशक्त पटकथा आणि चुरचुरीत संवाद मनोरंजनाची पूर्ण हमी देऊन जातात. ‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत,शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
https://www.youtube.com/watch?v=HR7gAYimb34
या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. प्रसन्न वातावरणात लग्न समारंभ रुपेरी पडद्यावर साकारतो. सलील कुलकर्णी यांनी कथा,पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.