मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेबसिरीज मधून अभिनय करत मराठीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केलं आहे. प्रिया बापट तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. प्रियाने नुकतीच तिच्या बाबांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.
प्रियाने वडिलांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने तिची बहीण व वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे.शिवाय प्रियाने लग्नानंतर तिचं आडनाव का नाही बदललं? याचंही कारण सांगितलं आहे.
प्रियाची पोस्ट
प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.
मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे.
प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे "माझे बाबा". अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A Economics केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा.
मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला "प्रिया" म्हटलत आणि "प्रिया शरद बापट" ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.