By  
on  

मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषेविषयी अभिनेता प्रतिक देशमुखच्या अशा आहेत भावना

मुळचा पूण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून  वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी त्याने केली पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड  त्याला  परत मायदेशी घेऊन आले. प्रतिकने  ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे.

सर्वसाधारणपणे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने शुभ लग्न सावधान सिनेमातून मराठी सिनेसृष्टीतून पदार्पण करणं पसंत केले आहे.  मराठी राजभाषादिनानिमित्त मातृभाषेविषयी मराठीतला चॉकलेट बॉय प्रतीकने ‘पीपिंगमून मराठी’शी दिलखुलास बातचित केली.

तू मराठी  भाषेसोबत कशाप्रकारे जोडला गेला आहेस?

उत्तर: माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. पण आईमुळे मला मराठी भाषेची गोडी लागली. माझ्या आईला वाचनाचं प्रचंड वेड होतं. तिच्यामुळे मीही वाचू लागलो. पु.ल. देशपांडेंचं साहित्य मला विशेष आवडतं. मराठी नाटकांची गोडीही मला अशीच लागली. मी आईसोबत ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ हे नाटक पहायला गेलो होतो. ते नाटक मला इतकं आवडलं की त्यानंतर जवळपास आठ वेळा मी ते नाटक पाहिलं असेन. शाळेतही मी नाटकात भाग घ्यायचो आणि बक्षीस मिळवायचो. याशिवाय अमेरिकेला जातानाही माझ्यासोबत श्रीमानयोगी, स्वामीसारखी पुस्तकं घेऊन गेलो होतो. त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझी मुळं मातृभाषेशी जोडलेली राहिली. मराठी कलाकार या नात्याने यु.एस (युनायटेड स्टेट्स)मधील मराठी लोकांचा मराठी सिनेमा किंवा नाटकांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे?

उत्तर: मी अमेरिकेत असताना ग्रुपमधील सात ते आठ जण महाराष्ट्राशी जोडलेले होतो. परड्यूमध्ये गणेशोत्सव साजरा करतात असं समजल्यावर मी तिथे गेलो. तिथे गणेशोत्सवा दरम्यान नाटकं बसवली जायची. ती पहायला जायचो. शिकागोसारख्या ठिकाणी मराठी नाटकाचे प्रयोग होणार असले की परड्यू विद्यापीठातून एक बस करूनच आम्ही ते नाटक पहायला जायचो. या प्रवासाला जवळपास २ तास लागतात. त्यामुळे परदेशातही मराठी नाटकं आग्रहाने बसवली जातात आणि तितक्याचं रसिकपणे पाहिलीही जातात, हे तेव्हा चांगलंच उमगलं.

तुझे आगामी कोण-कोणते प्रोजेक्ट्स आहेत?

उत्तर: मी येत्या काळात ‘जजमेंट’ नावाच्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. समीर रमेश सुर्वे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. झी टॉकीजच्या आणखी एका सिनेमात मी दिसणार आहे.त्याविषयी तुम्हाला लवकरच समजेल.

अलीकडे मराठी भाषेचं अस्तित्व धोक्यात आहे अशी ओरड सतत केली जाते. तू याच्याशी कितपत सहमत आहेस?

उत्तर: खरं पाहता मला असं वाटत नाही. मराठी भाषा लोप पावत चाललेली नाही तर मराठी माणसासमोर भाषेचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पाहा ना, एखाद्याला मराठी येत नसेल तर आपण पटकन हिंदी किंवा इंग्लिशचा पर्याय निवडतो. सिनेमांच्या बाबतीतही हेच दिसून येतं. याच्या उलटही अनेकदा दिसून येतं. काही बाबतीत सिनेमा किंवा नाटकांचं इतकं मराठीकरण होतं की आजच्या पिढीला ते जड वाटू लागतं. अशा वेळी ही कलाकृती विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित रहाते. हे टाळायचं असेल तर मराठी कलामाध्यमं अधिक सोपी आणि सुगम होणं गरजेचं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive