अभिनयाच्या दिशेने हा वैमानिक तरुण घेणार उंच भरारी

By  
on  

ध्येयपूर्तीचा ध्यास घेणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनात उंच भरारी घेतो, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि गगनभरारी चे स्वप्न पूर्ण करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता प्रणव पिंपळकर. आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैमानिक आणि आपली आवड पूर्ण करण्यासाठी अभिनय या दोन्ही बाजू उत्तम सांभाळत वैमानिक ते अभिनेता असा प्रवास प्रणवने गाठला आहे.

वैमानिक असताना त्याला त्याच्या अंगी असलेली अभिनयाची आवड मात्र शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच त्याने अभिनयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लवकरच प्रणव 'साई कमल प्रॉडक्शन' निर्मित 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अजित शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय तो सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर यांच्या तरुणाईवर आधारीत 'इश्काचे क्वारंटाईन' या गाण्यावर थिरकणार असून 'खंडेराया पडतो पाया' आणि एका जबरदस्त मराठी रॅप मधून अभिनय आणि नृत्यकलेचा समतोल राखताना दिसणार आहे. 

प्रणवला अभिनेता प्रशांत दामले,प्रीतम पाटील, मंगेश देसाई, अभिनेत्री निर्मिती सावंत, अलका कुबल, संगीतकार अजय अतुल  यांसारख्या दिग्गजांकडून कायमच अभिनयाचे धडे मिळत आले आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच नाटकांतून त्याने आपली अभिनयाची आवड जोपासली. मात्र चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा ध्यास प्रणवला शांत बसू देत नव्हता या त्याच्या अंगी असलेल्या चिकटीमुळे प्रणवने वैमानिकाकडून अभिनेता बनण्याकडे आपला प्रवास वळविला आहे.

विशेष म्हणजे वैमानिकाचे शिक्षण पूर्ण करून परदेशात नोकरीची उत्तम संधी असताना केवळ त्याचं पहिलं प्रेम असणाऱ्या अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटविण्याचा निर्णय घेतला. अभिनय, नृत्यकला, तरणाबांड व्यक्तिमत्त्व आणि नम्र स्वभाव या गुणांमुळे प्रणव चित्रपटसृष्टीत येऊन साऱ्या सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवेल यांत शंका नाही.

Recommended

Loading...
Share