By  
on  

भाभीजीचा पहिला मराठी सिनेमा; अभिनेत्री शिल्पा शिंदेचं लवकरच मराठीत पदार्पण

भाभाजी म्हणून घराघरात लोकप्रिय झालेली आणि नंतर बिग बॉस 11 चं विजेतेपद पटकावून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करतेय. मूळची महाराष्ट्रीयन असलेल्या शिल्पाने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकरल्या आहेत. भाभीजी घर पर है आणि नंतर बिग बॉस 11चं विजेतेपद पटकावल्याने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. त्यानंतर तिच्या मराठी पदार्पणाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. आनंद चव्हाण यांच्या अबलख या आगामी सिनेमाद्वारे मराठी पदार्पणासाठी शिल्पा सज्ज झाली आहे.

या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमात शिल्पा ही अभिनेता राकेश बापटसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणते, "माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी या इंडस्ट्रीतल्या लोकांना जास्त ओळखत नाही. एकदा दिग्दर्शक आनंद यांनी मला कॉल करुन या सिनेमाची कथा ऐकवली आणि् भूमिकेची विचारणा केली होती मला ती ऐकताच क्षणी आवडली व मी त्वरित होकार कळवला. मी स्वत: माझ्या या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाविषयी खुप उत्सुक आहे."

शिल्पा पुढे सांगते, "पहिल्याच मराठी सिनेमात मी राकेश बापटसोबत काम करणार आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. राकेशला मी आधीपासूनच ओळखते. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणं आणखी सोप्पं जाणार आहे."

यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहरे अबलख या सिनेमात नायिका साकारणार होती. अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थनाच्या नावाची या सिनेमासाठी निवड झाली होती. परंतु तारखांच्या अभावी प्रार्थनाने या सिनेमास नकार दिला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive