By  
on  

सशक्त व्यक्तिरेखांच्या स्त्रियांची रुपेरी पडद्यावरही गरज : पुर्वी भावे

जागतिक महिलादिनानिमित्त प्रसिध्द निवेदिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री पूर्वी भावेसोबत पिपींगमून मराठीने तिची खास मतं जाणून घेतली.

एक अभिनेत्री म्हणून तुला मराठी सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखा कितपत सशक्त झाली आहे असं वाटतं?

नक्कीच सिनेमातल्या स्त्रिया सशक्त झाल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. शेवटी सिनेमासुध्दा आपल्या समाजाचंच एक प्रतिबिंब आहे. आज विविध क्षेत्रात महिलाच सर्वोच्च स्थानावर आहेत. मग ते क्षेत्र कुठलही असो. कला, क्रिडा किंवा एखादं शैक्षणिक क्षेत्र असो. सगळीकडेच त्यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. हल्ली जुन्या काळातल्या व्यक्तिरेखांवर सिनेमे येण्याकडे कल वाढलाय. यात अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाचं नाव आग्रहानं घ्यावं लागेल.

तू या दिवसाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतेस, महिला दिन साजरा करण्याची खरंच गरज आहे का?

  • आपण एरवी अनेक दिवस साजरे करत असतो. पण महिला दिनाची खरच आवश्यकता आहे असं मला मनापासून वाटतं. पण विशेष म्हणजे महिलांनी स्वत: हा दिवस मनापासून जगायला हवं. खरं तर स्त्रीवाद किंवा महिला दिन याचा मुख्य हेतू म्हणजेच स्त्रियांना समान पातळीवर लेखणं हा आहे. कौंटुंबिक, सामाजिक संधींच्या, आर्थिक पातळीवर असलेली समानता साधणं हा या दिवसामागचा मुख्य हेतू आहे.

एक स्त्री आणि एक अभिनेत्री म्हणून कोणती चौकट तुला मोडीत काढावीशी वाटते?

  • आतापर्यंत मुलीची किंवा स्त्रीची एक प्रतिमा सतत आपल्या मनावर ठसवली गेली आहे. सोशीक, शांत, प्रश्न न विचारता खाली मान घालून ऐकणारी मुलगी सद्गुणी समजली जाते. त्यामुळे मालिकांमधील व्यक्तिरेखाही साधारण अशाच असतात. याउलट प्रश्न विचारणा‌-या आपल्या मताबद्दल ठाम असलेल्या मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो. आजच्या स्त्रिया, ज्या स्वत:च्या मतावर ठाम आहेत, कदाचित नव-यापेक्षा जास्त कमवतात अशा स्त्रिया किंवा मुलींचं चित्रण मलिकांमधून फार कमी दिसतात. किंबहुना दिसल्या तरी लग्नापुर्वी आणि लग्नानंतरच्या त्यांच्या स्वप्नात कमालीचा बदल होतो. मलाही करीअरमध्ये अशी एखादी व्यक्तिरेखा साकारायची आहे, ज्यातील स्त्रिला स्वत:चं अस्तित्व असेल आणि अस्मितेची जाणीव असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive