By  
on  

‘सावित्री ज्योती’ मालिका बंद होत असल्याने महेश टिळेकर यांनी व्यक्त केला संताप, वाचा सविस्तर

स्त्रीशिक्षणाची कास धरणारे समाज प्रवर्तक महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारलेली मालिका म्हणजे सावित्री जोती. सोनी मराठीने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या निमित्ताने आभाळाएवढ्या माणसांचं जीवन अनुभवयाची संधी प्रेक्षकांना मिळाली.  पण या मालिकेला टीआरपी मिळत नाहीये. त्यामुळे ही मालिका लवकरच संपणार असल्याचं समोर आलं आहे. या गोष्टीवर खरमरीत टीका करणारी पोस्ट दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘याला जबाबदार कोण?

 

 

’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टी आर पी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे.पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी,सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींच्यावर कुरघोडी करणाऱ्या जावा,हे असं सगळं बटबटीत पहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

विनोदाच्या नावावर काही कलाकार माकडचाळे करून प्रेक्षकांना हसविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना पाहून नक्की विनोद कश्याला म्हणायचा असा प्रश्न पडतो. पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे काही कलाकार आहेत.बरेचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रियालिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच.अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल,की जीव तोडून मेहनत घेऊन टी आर पी च्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही. सावित्री ज्योती सारखी उत्तम मालिका प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?

Author

Recommended

PeepingMoon Exclusive