अभिनेत्री स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. याशिवाय व्यक्ती म्हणून असलेल्या सामाजिक जबाबदारीचं भान तिला आहे. अलीकडेच तिने एका महत्त्वाच्या विषयावर मत व्यक्त केलं. स्पृहाने तिच्या फेसबूक वॉलवर राजकारणात येणा-या अभिनेत्रींवर होणा-या ट्रोलिंगविषयी मत व्यक्त केलं आहे.
स्पृहा या पोस्ट मध्ये म्हणते, लोकसभा निवडणुका जवळजवळ येत चालल्यात, तसा सगळ्याच पक्षांचा प्रचार जोरदार चालूच आहे. अभिनेते-अभिनेत्रींनी राजकारणात उतरणं हे काही नवं नाही. यंदाही उर्मिला मातोंडकर काँगेसकडून रिंगणात उतरल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. बंगालमधून तृणमूल काँग्रेस कडून मिमी चक्रवर्ती, नुस्रत जहाँ या अभिनेत्री आहेत ज्या ट्विटरपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे ट्रेंडिंग आहेत. चर्चेचा विषय झाल्यात.
गंमत अशी की या अभिनेत्रींसाठी राजकारणातली एंट्री तशी कसरतच असते म्हणजे अर्थातच 'अभिनेत्री' म्हणून असलेली लोकप्रियता हा त्यांच्या आणि त्यांच्या पार्टीसाठी 'कॅश' करण्याचा विषय असतोच. पण आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये - माफ करा पण धडधडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे - तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचं 'अभिनेत्री' असणं हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवलं जातं.’
यावर परखड मत व्यक्त करताना स्पृहा म्हणते, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा... कितीतरी जण उतरलेत की राजकारणात.
मग फक्त स्त्री कलाकारांच्या बाबतीत अशी सोयीस्कर घाणेरडी वृत्ती कशी उभारून येते आपल्याकडे ? याची पाळंमुळं फार खोल रुजली आहेत. बाईला नुसती वस्तू मानण्याच्या आपल्या किडक्या मनोवृत्तीत. याशिवाय अशा ट्रोलर्स किंवा वाचाळ नेत्यांना जरब बसवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, हे देखील तिने स्पष्ट केलं आहे.
https://twitter.com/spruhavarad/status/1114760124462174209