देशभरात सध्या कोरोनाने थैमाल घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतोय. सरकारकडून करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. सिनेसृष्टीची सौंदर्यसम्राज्ञी आणि बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे करोनाच्या या संकट काळात खबरदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे.
माधुरी दीक्षितने एक व्हिडीओ शेअर करत मास्कचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याबद्दल सांगत सुरक्षित रहा असा सल्ला दिला आहे. माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओत कश्या प्रकारे अनेक लोक चुकीच्या पद्धतीने मास्क वापरतात हे तिने दाखवलं आहे. काही जण नाकाच्या खाली तर काही जण अगदी हनुवटीवर मास्क घालतात हे दाखवत तिने या पद्धती चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे व योग्य पध्दत दाखवलीय.
सध्या करोना संकट काळात परिस्थिती बिकट होत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामे नाहीत, ऑक्सीजन पुरवठा अपुरा आहे, तर रेमडेसीवीर इंजेक्शनही मिळेनासं झालंय. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहून व योग्य ती खबरदारी घेत सुरक्षित राहायचंय व कुटुंबियांची पण काळजी घ्यायचीय.