असं म्हणतात भांडायलादेखील कला लागते. पण ही कला शिकवण्याचे देखील कोणी क्लासेस घेऊ लागले तर? असंच काहीसं घडत आहे ’६६ सदाशिव’ या सिनेमात. ६६ सदाशिव या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मोहन जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच मोहन जोशी ६६ व्या कलेबद्द्ल म्हणजेच वाद विवादाबद्दल बोलताना दिसतात. ‘शास्त्रशुद्ध वाद घालण्याची कल’ म्हणजेच ६६ वी कला. याचे क्लासेस घेताना दिसतात. पण या कलेची साधना (?) करण्यात येणारे अडथळे देखील या सिनेमामध्ये दिसतात.
https://www.youtube.com/watch?v=a6obUUPHrRE
चित्रकलेच्या क्षेत्रात नाव केल्यानंतर योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. योगेश अलीकडेच ग्रहण या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आले होते. ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ’६६ सदाशिव’ चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर महेश मांजरेकर, आसावरी जोशी, विजय निकम खास भूमिकेत दिसतील. हा सिनेमा १० मे २०१९मध्ये रिलीज होत आहे.