तो आला, त्यांनी पाहिलंआणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला... आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणजेच आपल्यासगळ्यांचा लाडका 'लक्ष्या'... दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्या या विनोदाच्या बादशाहाची एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती...
विनोदाचं अचूक टाईमिंग, हावभाव आणि कमालीचा निरागस चेहरा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. लक्ष्याला जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी रसिक प्रेक्षकांचं त्याच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.आजही त्याचे सिनेमे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात. तो नेहमीच रसिकांच्या स्मरणात राहील.
लक्ष्मिकांत बेर्डे यांचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. लाडक्या लक्ष्याची एक जुनी दूरदर्शनवरील मुलाखत सोशल मिडीयावर बरीच व्हायरल होत आहे. यात त्याने आपल्या संघर्षाबद्दल सांगितलंय.
लक्ष्या म्हणतो, मला छान कपडे घालून स्टाईल करायला शानशौकीत रहायला आवडायचं. मग त्यासाठी पैसे कुठून आणणार. घरची तशी परिस्थिती नव्हती. मग लॉटरी विकायचो. दिवाळीत उटणं, फटाकेसुध्दा विकले आहेत. पण असं कधीच वाटलं नव्हतं की 10 वर्षानंतर त्या लॉटरीवर माझाच फोटो मला पाहायला मिळेल.