By  
on  

अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम साँगमध्ये

आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते. वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील उत्कट भावना ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्यातून उलगडण्यात आल्या आहेत. अजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुंदर अशा गाण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉंगमध्ये दिसत आहेत.

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे ‘सॉंग सिटी मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक अजित पाटील आणि त्यांच्या टीमने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे हे गाणे अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे चर्चेत आहे.

 

 

अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे संगीतबद्ध केले आहे, सोनाली चंदात्रे यांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गीत गायले आहे. या गाण्याचे कालादिग्दर्शन वैभव शिरोळकर, छायांकन साईनाथ माने यांनी केले असून संकलन अमोल निंबाळकर यांनी केले आहे.

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक अजित पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे मराठी माणसांच्या भेटीला आणत आहोत. या गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी एका अल्बम सॉंग साठी काम केले आहे, त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी या गाण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरणारा आहे. गाणे बघितल्यानंतर त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही कामाचे समाधान देणारी आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive