सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवीन इतिहास रचला. मराठी सिनेमासुध्दा 100 कोटी क्लबमध्ये जाऊ शकतो हे सैराटने सिध्द करुन दाखवलं. सैराटबद्दल काय बोलणार मराठीच नाही तर संपूर्ण बॉलिवूडसुध्दा झिंगाट झालं. सैराटने यशाचे अनेक विक्रम केले. म्हणूनच तर बॉलिवूडकरांनासुध्दा त्याचा हिंदी रिमेक करण्याचा मोह आवरता आला नाही.
सैराटचे आर्ची आणि परश्या म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत. सैराटनंतर आर्ची-परश्या फेम रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या जोडीने एकत्र काम केलं नसलं तरी अनेक विविध मोठ्या प्रोजेक्टसमधून ते चाहत्यांच्या भेटीला आले आहेत.
नुकतंच आर्ची आणि परश्याची अनेक वर्षानंतर गाठ-भेट झाली. या सुंदर रियुनियनचे फोटो रिंकूने तिच्या सोशल मिडीयावरुन शेअर केले आहेत.
सैराटमधली दोघांची केमिस्ट्री खुपच भन्नाट होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकत्र पाहायला चाहत्यांना नक्की आवडेल.