मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाची दाणादाण उडवली आहे. आधीच करोनाचं संकट त्यात ही नैसर्गिक आपत्ती. इकडे आड तिकडे विहीर अशीच अवस्था सध्या जनमानसाची आहे. पावसाने आणि पुराने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं तर अवघा महाराष्ट्र हळहळला.
राज्यातील रायगड, चिपळून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स सुरु आहेत. अनेक निष्पाप लोकांचे यात बळी गेले आहेत. चोहोबाजूंनी कोकणातील आपल्या सर्व मित्रबांधवांना मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे. अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना कोकणाला मदत करण्याचे आवाहन केलं आहे.
भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असे खुपच हदयस्पर्शी कॅप्शन लिहले आहे.
या पोस्टमध्ये त्याने एक मेसेज फोटोत दिला आहे. युथ फॉर डेमॉक्रसी आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरून-पांघरुण मदत कुठे आणि कशी कराल यासाठी त्याने फोन नंबर देखील दिले आहेत.