'दुहेरी' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्मिला अभिनेत्रीसोबतच यशस्वी युट्यूबर देखील आहे. आपल्या पोस्टमधून उर्मिला चाहत्यांसोबत अनेक किस्से शेअर करत असते. अभिनय कारकिर्दीच्या खडतर प्रवासात आलेल्या एका कटू अनुभवाचा किस्सा नुकताच तिने चाहत्यांशी शेअर केला आहे.
धक्कादायक प्रसंग म्हणजे जेव्हा उर्मीलावर चोरीचा आळ घेण्यात आला होता. परंतु, आता मात्र ज्या लिपस्टिकमुळे उर्मिलावर चोरीचा आळ घेण्यात आला, त्याच लिपस्टिकच्या ब्रॅण्डने उर्मिलाच्या युट्यूब चॅनलवर प्रसिध्दी करण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे हा आनंद शेअर करताना उर्मिलाने त्या कठीण प्रसंगाचं कथन इथे केलं आहे.
उर्मिला आपल्या पोस्टमध्ये लिहते, " तर झालं असं..एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.
परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता ️
आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो! "