मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाची दाणादाण उडवली आहे. आधीच करोनाचं संकट त्यात ही नैसर्गिक आपत्ती. इकडे आड तिकडे विहीर अशीच अवस्था सध्या जनमानसाची आहे. पावसाने आणि पुराने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं तर अवघा महाराष्ट्र हळहळला.
राज्यातील रायगड, चिपळून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स सुरु आहेत. अनेक निष्पाप लोकांचे यात बळी गेले आहेत. चोहोबाजूंनी कोकणातील आपल्या सर्व मित्रबांधवांना मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे.
मराठी सेलिब्रिटींनी या मदत कार्यात खुप मोठा पुढाकार घेतला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रवी जादव यांनीसुध्दा आर्या या त्यांच्या एनजीओ मार्फत मोठी मदत पूरग्रस्तांपर्यंत पाठविण्याचं ठरवलंय. त्याचेच फोटो नुकतेच त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले.