येऊ कशी तशी मी नांदायला फेम स्विटू अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. गोड-गोजिरी आणि तितकीच गुबगुबीत नायिका सर्वांनाच भावली. ओम आणि तिची केमिस्ट्री तर तुफान गाजतेय. सडपातळ नाजूक-साजूक नायिकेची चाकारी स्विटू फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने कधीच मोडीत काढलीय. परंतु, आपल्या जाड असण्यामुळे अन्विताला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. बारीक असणं म्हणजे सुंदर असणं नसतं, असं अन्विताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर अन्विता आज अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरतेय. जाड असणं म्हणजे सुंदर नसणं ह्या परिभाषेला ती छेद देतेय.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अन्विता तिला आलेल्या कटू अनुबवाबद्दल सांगते, 'मला लहानपणापासून माझ्या शरीरावरून खूप टोमणे मारले गेले. लोक मला जाडी म्हणायचे. जाडी हे तुमचं टोपणनाव असू शकत नाही. काही तर म्हणायचे, खूप खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होणार नाही. मला खूप वाईट वाटायचं. लोक माझ्याबद्दल खूप काही बोलायचे पण मी आता प्रेक्षकांची मनं जिंकली. मला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून मी भारावून जाते'