करोना लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये राज्यसरकारने हळूहळू टप्याटप्याने सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केलीय. उद्योगधंदे, खासगी कार्यालये, हॉटेल, मॉल्स, जीम हे रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु राज्यातील धार्मिक स्थळे, नाट्यगृहे आणि सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. नाट्यगृह आणि सिनेमागृहांबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने प्रसिध्द अभिनेते आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांनी राज्यसरकारला टोला लगावला आहे.
प्रशांत दामले यांच्या या फेसबुक पोस्टने सर्वांंचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रशांत दामले यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.. यात त्यांनी लिहिले की, 'राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा! म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या. आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार...' अशी उपरोधिक पोस्ट लिहित प्रशांत दामले यांनी सरकारला उपरोधिक टोला लगावला.
करोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करताना राज्य सरकारने मनोरंजन सृष्टीला डावलेले असल्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते , दिग्दर्शक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.