प्रेक्षकांनी एकमुखाने गौरवलेलं नाटक म्हणजे ‘सही रे सही’. केदार-भरत या जोडीने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाची घोडदौड आजही सुरु आहे. या नाटकाला आज रंगभूमीवर येऊन 20 वर्षं पुर्ण होत आहेत. या निमित्ताने भरतने खास पोस्ट केली आहे. भरत आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘सही रे सही' ची तालीम सुरू होती, संपुर्ण सेट लावलेला. तेंव्हा ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये म्हणाले होते की, "अरे बापरे बऱ्याच वर्षांनी रंगमंचावर एखाद्या नटाचा एवढा मोठा फोटो पाहिला..!!"
त्यावेळी थोडा घाबरलो होतो. १५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग लागला.रंगदेवतेची कृपा झाली आणि पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला. पहिल्या प्रयोगापासूनच 'सही रे सही' म्हणजे हाऊसफुल्ल हे समीकरण झालं. आज ३३०० पेक्षाही अधिक प्रयोग ह्या नाटकाचे झालेत आणि अजूनही हे नाटक पाहायला रसिकांची हाऊसफुल्ल गर्दी होते. ८०-८० वेळा हे नाटक पाहिलेला रसिक 'सही' ला लाभलाय. भूतो न भविष्य असं यश आणि प्रेम या नाटकाला मिळालंय. हे नाटक आता आमचं राहिलंच नाहीये ते आता तमाम रसिक प्रेक्षकांचं झालय.
एकदा सही चा प्रयोग पाहिल्या नंतर डॉ. लागू म्हणाले होते की या नाटकातील प्रमुख नट व दिग्दर्शक नक्कीच घनिष्ट मित्र असले पाहिजेत त्याशिवाय एवढं वेगवान नाटक उभं राहूच शकत नाही. भरत - केदार आणि अंकुश च्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे सही रे सही. रसिकहो आज तुमचं 'सही' २० व्या वर्षात पदार्पण करतंय..!’ या सोबतच केदार शिंदे यांनी खास पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.