'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकत्याच झालेल्या महाएपिसोडमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते, असं दाखविण्यात आलं असलं तरी शेवटी मात्र हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
या लोकप्रिय मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ती लिहते, १६ ऑगस्ट २०२० ला ऐन पॅनडामिकमध्ये वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक वर्ष सरलं... गेले एक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा काल शेवटचा भाग प्रदर्शित झाला. रात्री १०:३० च्या स्लॉट ला असून सुद्धा सर्व मराठी मालिकांमध्ये नंबर वन राहण्याचा इतिहास या मालिकेने रचला ते केवळ मालिकेवर असीम प्रेम करणाऱ्या आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे. या साठी आपले सर्वांचे शतशः आभार.
'लागिर झालं जी' मधील भैय्यासाहेब असो वा 'देवमाणूस' मधील देवीसिंग उर्फ अजित कुमार देव किरण तू नेहमीच माझ्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक भूमिका अगदी उत्तम सकरलीस. सरू आजी आणि टोन्या मुळे तर जणू memes ची बरसातच झाली. इतकेच नव्हे डिंपल व तिचे आई-बाबा, वंदी आत्या, लाला, बज्या, नाम्या, दीपा, विजय, रेश्मा, अपर्णा, मंजुळा, दिव्या सिंग, आर्या देशमुख आणि आता नव्याने आलेली कोल्हापुरी मिरची म्हणजेच चंदा सर्वांनीच शेरास सव्वाशेर अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशेष म्हणजे इतकी पात्र मालिकेत येत-जात असूनही प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आपली एक वेगळी छाप उमटवत होत. सर्वच कलाकारांच्या दमदार अभिनयाला साथ मिळाली ती दिग्दर्शक राजू सावंत यांच्या दिग्दर्शनाची व स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम यांच्या लेखणीची. यांच्यामुळे अगदी सध्या 'Beautiful' शब्दापासून ते सरू आजीच्या गोड बोलीपर्यंत एकूण-एक डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीचा भाग ठरले. तसेच वज्र प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम आणि तंत्रज्ञ यांच्या अढळ पाठिंब्यामुळेच 'देवमाणूस' मालिकेचा हा इतका लांबचा पल्ला गाठणं शक्य झालं.
आपल्या सर्वांची लाडकी मालिका "देवमाणूस "आज आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्या साठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू पण तोपर्यंत तुमचं असच प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती.