By  
on  

यंदा छोट्या पडद्यावर धमाल उडवणार 'सैराट' मधील बाळ्या आणि सल्याची जोडी

मराठी चित्रपटाची एक वेगळी ओळख निूर्माण करणारा 'सैराट' हा चित्रपट कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे. या चित्रपटातील गाणी, कथा आणि विविध पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. परश्या आणि आर्चीच्या प्रेमकथेत त्यांना साथ देणारे मित्र बाळ्या आणि सल्या यांच्याही लक्षवेधी भूमिका ठरल्या होत्या. परश्या आणि बाळ्याची जोडी या सिनेमातून चांगलीच चर्चेत आली होती. हीच जोडी आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

यंदा मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर बाळ्या आणि सल्या धमाल उडवायला येणार आहेत. 'मन झालं बाजिंद' या आगामी मालिकेतून ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. बाळ्या फेम अभिनेता तानाजी गळगुंडे आणि सल्या साकारणारा अरबाज शेख हे दोन्ही कलाकार या मालिकेच्या निमित्ताने झळकणार आहेत.

प्रेमाचा रंग गुलाबी असं म्हटलं जातं मात्र पहिल्यांदाच प्रेमाचा रंग पिवळा असल्याचं पाहायला मिळणारेय. कारण 'मन झालं बाजिंद' या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. या मालिकेत कृष्णा आणि राया सोबत आता बाळ्या आणि साल्या देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. झी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच प्रसारित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive