काही दिवसांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महाराष्ट्रभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहचवली जात आहे.
आपल्या कोकणाला सध्या मदतीची गरज आहे. कोकणाने नेहमीच आपल्याला भरभरुन दिलं आहे. आता वेळ आली आहे ती आपण कोकणवासियांच्या पाठीशी उभं राहण्याची. मराठी कलाविश्वातील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागचे कलाकार यांनी आपल्या कोकणासाठी मदतीचा ओघ अद्यापही सुरु ठेवला आहे. सुबोध भावे, दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर करत या मदतीबाबत माहिती दिली.
ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, " वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये तेथील बांधवाना प्रेमाचा हात द्यायला आम्ही मराठी चित्रपट,नाट्य आणि मालिका क्षेत्रातील निर्माते,दिग्दर्शक,कलाकार आणि पडद्यामागील कलाकार असे सर्व एकत्र आलो. या वर्षी पुन्हा एकदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातला. अनेकांचे संसार उद्वस्थ झाले.पुन्हा आम्ही सर्व जण एकत्र आलो आणि आम्ही कोकण भागातील दुर्गम वस्तीपर्यंत स्वयंपाकाच्या शेगड्यांचं वाटप केलं.नुकसान खूप आहे याची आम्हाला कल्पना आहे.तुम्ही जे गमावलं आहे ते कशानेही भरून निघणार नाही.पण या परिस्थिती मध्ये आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी म्हणून हा एक प्रेमाचा हात.
तुम्ही या संकटातून नक्की बाहेर याल आणि पुन्हा खंबीर पणे उभे रहाल याची खात्री आहे.
तुम्हाला ती शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना"
जाता जाता 'कुसुमाग्रज' यांच्या दोन ओळी-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवर हात ठेऊन नुसते लढ म्हणा!