आज महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी या निमित्ताने शाहीर साबळेंच्या बायोपिकची घोषणा केली आहे. आता अभिनेता भरत जाधव यांनी शाहीरांसोबतच्या खास आठवणींना उजाळा दिला आहे. भरत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘साल १९८५, नुकताच १२ वी पास झालो होतो. शाहीर साबळे यांचे जावई मंगेश दत्त हे माझ्या भावाचे मित्र होते आणि महाराष्ट्राची लोकधारा मध्ये नृत्यात सहभाग घेण्यासाठी त्याला विचारत होते.
तो कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला जाणार होता. भावाने नकार दिला पण नृत्याचा कोणताही गंध नसताना मी होकार दिला. का ? कारण चमकायला मिळेल म्हणून. आणि तो क्षणच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
मी स्वतः ला नेहमी नशीबवान समजतो की करिअर च्या प्रत्येक महत्वाच्या स्टेपवर मला चांगली माणसं भेटत गेली.आणि त्यातील सर्वांत महत्त्वाची आणि पहिली व्यक्ती म्हणजे मा.शाहीर साबळे..!
महाराष्ट्राची लोकधारा मध्ये सुरुवातीला मी लोकनृत्य करत होतो. कोरस ला गात होतो.
मग हळूहळू आमचा एक ग्रुप तयार झाला, शाहिरांचा नातू केदार शिंदे, अंकुश चौधरी, संतोष पवार,अरुण कदम आणि मी. एकदा धाडस करून आम्ही 'दादला नको गं बाई' हे भारुड आम्ही करू का म्हणून शाहिरांना विचारलं. हे भारुड स्वतः शाहीर सादर करायचे पण त्यांनी आम्हाला ती संधी दिली. विंगेत बसून आमचं संपुर्ण भारुड पाहिलं आणि इथून पुढे तुम्हीच हे करत चला म्हणून सांगितलं. स्वतः शाहिरांनी एवढा विश्वास दाखवल्यामुळे आमचाही कॉन्फिडन्स वाढला.
शाहिरांना पाहत पाहतच आम्ही विनोदाचं टायमिंग, विनोदाच्या बारीक बारीक जागा कशा काढायच्या हे शिकलो.आमच्या सारख्या अनेक नवोदितांना त्यांनी रंगमंचावर मुक्तपणे वावरू दिलं, एवढा प्लॅटफॉर्म दिला.एक नट म्हणून मला घडवण्यात तर शाहिरांचा मोठा वाटा होताच पण एक माणुस म्हणूनही समृद्ध झालो ते त्यांच्याकडे बघूनच. लोकधारा च्या वेळेस कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर सामानाची ने आण आम्ही मुलंच करायचो.सामान उतरवल्या नंतर शाहिरांच्या मिसेस (माई) कधीही जेवू घातल्या शिवाय आम्हाला जाऊ देत नव्हत्या. केदार जरी शाहिरांचा नातू असला तरी आम्हालाही ते आजोबांच्याच स्थानी होते. आमच्यावरही ते तेवढीच माया करायचे.
त्यांचा धाकही वाटायचा आणि आधारही. आमच्या घरी कला क्षेत्रातील कोणीही नव्हतं. अभिनय आणि आमचा दुरदूरपर्यंत संबंध नव्हता. परंतु तरीही माझ्या आई वडिलांनी मला लोकधारामध्ये जाण्यापासून कधीच रोखलं नाही कारण त्यांना खात्री होती की हा शाहिरांकडे जातोय म्हणजे नक्कीच काही तरी चांगलं करतोय. आयुष्यात निर्भय असण्याइतकं सुख कशातच नसतं आणि शाहीर तसेच निर्भय होते सिंहाप्रमाणे. काळाच्या कितीतरी पुढे जाऊन ते विचार करायचे.’