बिग बॉस मराठीचं बिगुल वाजलंय आणि रसिक प्रेक्षकांना आता बिग बॉसच्या तिस-या सीझनची, घराची व सहभागी स्पर्धकांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. एन्टरटेन्मेंट होणार अनलॉक या टॅगाईननिशी बिग बॉसचे नवे प्रोमो झळकू लागल्याने शोबाबत सारेच आतुर झाले आहेत. नेहमीपेक्षा हा कार्यक्रम आणखी भव्य-दिव्य स्वरुपात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहे. टास्क, घरातले नियम या सर्वांत आणखी एका गोष्टीचा या कार्यक्रमात सहभागी होणा-या स्पर्धंकांना सामना करायचा आहे. तो म्हणजे करोना काळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा सेट भव्य असून थीम नुसार डिझाइन करण्यात आलाय. हा सेट गोरेगावच्या फिल्म सिटी येथे उभारण्यात आला आहे. करोना नियमांचे पालन करत घरात येणाऱ्या स्पर्धकांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकांची टेस्ट देखील केली जाईल. तसंच वेळोवेळी घरातील स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल, सॅनिटायझेशन ही करण्यात येणार आहे. घरात वाइल्ड कार्ड पकडून एकूण १६ स्पर्धकांचा समावेश असेल.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये काय राडा होणार, कोणाचं सूत जुळणार, कोण टास्क जिंकणार, कुठले चेहरे एकमेकांसमोर येणार. कोणामध्ये घट्ट मैत्री होणार आणि काय नवं पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांना १९ सप्टेंबरची वाट पाहावी लागेल.