मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे काही नवीन नाहीत . अनेकदा सोशल मिडीयावर केतकी आपल्या बेताल वक्तव्यामुळे ट्रोल तर होतेच पण वादाच्या भोव-यातही अडकते. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं,अशाच एका जुन्या वक्तव्यामुळे केतकीवर आता अटकेची टांगती तलवार आहे. केतकी कायदेशीर कचाट्यात अडकली असून केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय. एका जुन्या प्रकरणात केतकी अडकली असून या प्रकरणी ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे.
केतकीनं १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.
“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” या केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तिच्यावर एट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला.
या प्रकरणी आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्ण जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय.