सोशल मिडियाच्या जमान्यात कधी कोणती गोष्ट प्रसिद्धीच्या झोतात येईल हे सांगता येत नाही. दिग्दर्शक, गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. अवधूत यांच्या एका गाण्याला तब्बल वर्षभराने प्रसिद्धी मिळाली आहे. याबाबतची पोस्ट अवधूत यांनी शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, एखादं गाणं कधी केव्हा आणि कोणामुळे लोकांपर्यंत पोहोचेल हे साक्षात भगवंत सुद्धा सांगू शकणार नाहीत!! "जात" हे रॅप गाणं खरंतर मी मागच्या वर्षी केलं. परंतु, आमच्या कोल्हापूरचे श्री. कुलदीपजी कुंभार साहेब ह्यांच्या कानावर ते आत्ता पडलं... काही दिवसांपूर्वी. मग, त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले हे गाणं लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. त्यांनी नक्की काय काय केलं हे मला खरच माहीत नाही.
परंतु, त्यानंतर जणू काही हे गाणं आत्ताच रिलीज झाल्यासारखे मला अनेक फोन आले आणि YouTube वर गाण्याचे views सुद्धा वाढले! ह्यासाठी मी कुंभार साहेबांचा ऋणी आहे. समाजाच्या पिकाला लागलेली ‘जात‘ नावाची कीड ही वरवरची नाही. ती मातीत खोलवर रुजलेली आहे. ती काढून टाकण्यासाठी एखादे गाणे पुरेसे नाही. पण आपण प्रयत्न करत राहू.. काय? बरोबर ना? आज जो मारतो.. उद्या तेचा बी हात दुखतोच!!’