शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण आहे. नऊ दिवस देवीच्या पूजा अर्चा आणि आराधनेत भाविकक तल्लिन होऊन जाणार आहेत. या चैतन्यमयी उत्साही वातावरणाची वर्षभर चातकासारखी वाट पाहिली जाते. गेल्या काही वर्षांपासून मराठी अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड रुजू होतोय. यात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचा मोठा वाटा आहे. हा पायंडा तिनेच रचला. विविध संकल्पना घेऊन तिने नवरात्रीचे नऊ दिवस फोटोशूट गेले तीन वर्ष सातत्याने केले. या तिच्या अभिनव संकल्पनेला चाहत्यांचा सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरवर्षी तेजस्विनी नेमकं वेगळं काय सादर करणार याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते.
मागच्या वर्षी तेजस्विनीने नवरात्रौत्सव स्पेशल फोटोशूटमधून करोनाकाळात फ्रंटलाईनवर लढणा-या स्त्रियांना सलाम ठोकला. तिचं हे फोटोशूट खुप लोकप्रिय ठरलं. यंदाही तिच्या नवरात्री फोटोशूटकडे चाहते डोळे लावून होत्, परंतु यंदा काही कारणास्तव आपण थोडा ब्रेक घेतल्याचं एका सोशल मिडीया पोस्टद्वारे तिने सांगितलं आहे.
तेजस्विनी म्हणते, "नमस्कार ! कसे आहात ? सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!
सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार आणि माफी सुद्धा !! आभार तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल की गेल्या ३ वर्षांप्रमाणे याही वर्षी मी नवरात्री निमित्त खास फोटो , संदेशांच्या माध्यमाने तुम्हाला भेटायला येईन, आणि माफी यासाठी की ते या वर्षी शक्य झालं नाही. दोन दिवस आधीपासूनच तुमचे असंख्य मेसेजस मला मिळत होते आणि कुठेतरी मनाला सुखावतही होते , आजच्या क्षणार्धात बदलणाऱ्या जगात तुम्ही माझ्या कलाकृतींची नोंद ठेवलीत हा माझा बहुमान आहे.
पण तरीही या वर्षी मी कोणतीच संकल्पना साकारली नाही. अर्थात याची अनेक कारणे देखील आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझा नवनिर्मितीचा ध्यास. माझ्या production house कडून तुमच्यासाठी दर्जेदार कलाकृती घेऊन लवकरच येते आहे आणि Trust me its not at all an easy task. असं म्हणतात कोणतीच गोष्ट half heartedly करू नये, आणि रसिक प्रेक्षकांसाठी तर नाहीच नाही. आणि म्हणूनच या वर्षी जरा थांबण्याचा निर्णय घेतला.
पण लक्षात घ्या हा पूर्ण विराम नाही , अर्ध विराम आहे...आणि अर्धविराम पुढील वाक्याचा अर्थ अजून वाढवतो. तेंव्हा पुढच्या वर्षी अजून दमदार संकल्पने सह तन, मन, धन अर्पून तुमच्या समोर येईन. आणि या वर्षी माझी संकल्पना जरी तुमच्या समोर आली नसली तरी माझ्या अनेक चाहते, अनुयायी, सहरंगकर्मींनी प्रेरणेची ही मशाल पुढे धगधगत ठेवली आहे आणि याचा मला मनापासून आनंद आहे.
तेंव्हा पुन्हा एकदा आभार आणि माफी पुन्हा एकदा !!! आणि ठाम विश्वास की हो पुढच्या वर्षी नक्कीच भेटू
देव बरे करो
तेजस्विनी