गाथा नवनाथांची या लोकप्रिय मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी ही मालिका घेऊन आली आणि जनसामान्यांत लोकप्रिय झाली. नवनाथांच्या जन्मांच्या आणि कार्याच्या कथा, ज्या आत्तापर्यंत कधीच दृश्य स्वरूपात बघितल्या नव्हत्या या मालिकेत दाखवण्यात आल्या.
माश्याच्या पोटातून आलेले मच्छिन्द्रनाथ, गोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथ, मातीतून अवतरलेले गहिनीनाथ, आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथ या नाथांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केल्याचं आत्तापर्यंत दाखवण्यात आलं.
आता हि मालिका एका रंजक टप्प्यावर पोहचली आहे जिथे मच्छिन्द्रनाथ एका मोठ्या संकटात अडकणार असल्याचं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हनुमानाला सीतामाईने दिलेलं लग्नाचं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मच्छिन्द्रनाथांवर येते आणि त्यांना स्त्री राज्यात प्रवेश करावा लागतो जिथे त्यांची भेट राणी मैनावतीसोबत होते. मच्छिन्द्रनाथ वचन पूर्ण करू शकतील का आणि या संकटातून ते कसं सुटतील याची गोष्ट पुढील काही भागांत दाखवण्यात येणार आहे.
मैनावतीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांना बघायला मिळणार आहे. स्त्रीराज्याच्या या कथेसाठी मोठ्या सेटची उभारणी करण्यात आली असून, प्रेक्षकांना भव्य स्वरूपातल्या दृश्यांची मेजवानी मिळणार आहे. या सेटची निर्मिती सतीश पांचाळ यांनी केली असून निर्माते आणि लेखक संतोष अयाचित यांनी या मालिकेचे लेखन केले आहे.
सोनी मराठीवरील या मालिकेमुळे नवनाथांचा महिमा घराघरात पोचत आहे. पाहा, गाथा नवनाथांची, सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.