सध्या सगळ्यांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे पेट्रोल दरवाढ. दिवसागणिक पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव प्रत्येकालाच अस्वस्थ करणारे आहेत. या भाववाढीवर अभिनेता सुबोध भावेच्या मार्मिक पोस्टने लक्ष वेधलं आहे. आपल्या पोस्टमध्ये सुबोध म्हणतो, ‘सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.
दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ..... कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद चाहतेही सुबोधच्या या पोस्टवर उत्साहाने कमेंट करताना दिसत आहेत.