भारताकडून ऑस्करला पाठवल्या जाणा-या सिनेमाचं नाव नुकतंच समोर आलं आहे. सिनेमा निवडीच्या शर्यतीत मल्याळम सिनेमा 'नयातू', तमिळ सिनेमा 'मंडेला', सिनेमा निर्माते शूजित सरकारचा 'सरदार उधम', विद्या बालनचा 'शेरनी', फरहान अख्तरचा 'तुफान', कॅप्टन विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' आणि मराठी सिनेमा 'गोदावरी' ही या शर्यतीत होते.
यावेळी गोदावरीचा निर्माता असलेला अभिनेता जितेंद्र जोशीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘बोर्डाच्या परीक्षेत देशात, राज्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याच्या फोटोसोबत विशेष प्राविण्य मिळालेल्या, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याचं देखील नाव वर्तमानपत्रात छापून येतं तेव्हा ते वाचून त्याच्या पालकांना आणि मित्र मैत्रिणींना आनंद होतो कारण अभ्यास त्याने ही केलेला असतो . सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विद्यार्थी जिथे राहतो त्या विभागात, गल्लीत, सोसायटीत सर्वांच्या आनंदाला उधाण येतं कारण ते त्याला अभ्यास करायला मदत करतात . सर्व जण मिळून आनंद साजरा करतात आणि पुढे अभ्यास सुरू राहतो .
गोदावरी!!!
पहिला प्रयत्न!!
पहिला चित्रपट !!आणि थेट ऑस्कर च्या पहिल्या शर्यतीत पोहोचला. निसटता का होईना पण स्पर्श झाला. "कुझांगल" ला मनः पूर्वक शुभेच्छा!! गोदावरी च्या संपूर्ण संघाचं अभिनंदन!