By  
on  

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सावनी रविंद्रला 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके'चा पुरस्कार प्रदान

आज दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' वितरण सोहळ्यात सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका 'सावनी रविंद्र' हीला 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सावनीची मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती अश्या विविध भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका 'सावनी रविंद्र' राष्ट्रीय पुरस्काराविषयी सांगते, ''आज मला या नामांकीत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरवण्यात आले. त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नाही आहे. मी हा पुरस्कार माझ्या दोन महिन्यांच्या मुलीला समर्पित करते. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे. अर्थातच माझ्या सर्व गुरूजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडीलांचे कष्ट आणि कुटूंबीय यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले."

सावनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील अनुभवाविषयी सांगते, "खरतर 'रान पेटलं' या गाण्यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्या गाण्यामध्ये एका आईचं मनोगत दाखवलं आहे. जेव्हा मी गाणं गायलं होतं. त्यावेळी माझं लग्नही झालं नव्हतं. परंतु आज मी एका आईच्या भूमिकेत आहे. आणि आज त्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मी माझ्या दोन महिन्याच्या मुलीला घेऊन दिल्लीला आली आहे. जेव्हा ही राष्ट्रीय पुरस्काराची बातमी माझ्यापर्यंत आली तेव्हा मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर होते. आणि आता मी आई झाले आहे. एका आईनेच गायलेल्या गाण्यासाठी मला हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा पुरस्कार मला उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. माझ्यासाठी हा क्षण खूप अभिमानाचा होता. मी आजवरच्या इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं फळ देवाने आज मला दिलं आहे, अशी भावना मनात होती."

पुढे ती सांगते, "बार्डो चित्रपटातील संगितकार रोहन - रोहन यांचे मी मनापासून आभार मानते. कारण मी काहीतरी वेगळं करू शकते. हा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. हे गाणं माझ्या नेहमीच्या आवाजापेक्षा फारचं वेगळं आहे. मराठी मातीतील अस्सल अहिराणी भाषेत हे गाणं आहे. मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा संगितकार रोहन - रोहन यांच्या घरच्या सेटअपवर हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं. अत्यंत भावूक करणारं हे गाणं आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आजवर मी ज्यापद्धतीने गाणी गायली त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून प्रेक्षकांना आवडतील अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा मी कायम प्रयत्न करेन. या पुरस्काराच्या रूपात कौतुकाची थाप मला मिळाली असं वाटतं. अशीच भारतीय अभिजात संगीताची सेवा माझ्याकडून घडो. हीच सदिच्छा.''

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive