अभिनेता शुभंकर तावडेने या पध्दतीने केलं खास बर्थ डे सेलिब्रेशन

By  
on  

अभिनेता शुभंकर तावडेचा वाढदिवस 26 ऑक्टोबरला असतो. पॅनडेमिकच्या काळात वाढदिवस कसा साजरा करावा ह्याचे एक उत्तम उदाहरण त्याने यंदा आपला वाढदिवस विशेष मुलांसह साजरा करून दाखवून दिले. मंगळवारी मुंबईतल्या उमंग चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह शुभंकरने आपला वाढदिवस साजरा केला.

सुभंकरने ह्या मुलांसोबत केक कापला. त्यांना भेटवस्तू दिल्या. आणि एक छोटेखानी गेटटुगेदर पार्टी साजरी करून मुलांसह आनंद साजरा केला. शुभंकर ह्याविषयी म्हणतो,”गेल्या एक-दिड वर्षात आपल्या सगळ्यांच्या शारिरीक-मानसिक स्वास्थ्यावर घरात बसून खूप परिणाम झाला मग ह्या विशेष मुलांवर ह्या वातावरणाचा कसा परिणाम झाला असेल? त्यामुळेच आता बंधनं शिथिल झाल्यावर त्यांची शाळा उघडताना त्यांना आनंदित करावे,ह्याविचाराने मी माझ्या वाढदिवसाचं निमीत्त साधून त्यांच्यासाठी छोटेखानी पार्टी ठेवली.”

 

शुभंकरने मुलांना छोट्या कुंड्या-बियाणाचं वाटप केलं. शुभंकर म्हणाला, ”मला रोपं-झाडं लावायला खूप आवडतं. मुलांवर छोट्या-छोट्या गोष्टीतून संस्कार करावे लागतात. मी त्यांना बियाणं कसं पेरावं आणि त्याची कशी घ्यावी. मग रोपं कसं उगवतं हे समजावून सांगितल्यावर ते गिफ्ट त्यांना खूप आवडलं.”

ह्या पार्टीत शुभंकरसोबत मुलं अगदी मिसळून गेली होती. त्याच्यासोबत मुलांनी मराठी गाण्यांवर डान्सही केला. शुभंकर ह्या अनुभवाबद्दल म्हणाला,” मोकळ्या आभाळात उडणा-या पक्षाचा आनंद त्यांच्या चेह-यावर होता. हा निरागस आनंद पाहून मी ठरवलं की, वर्षातून एकदा तरी त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांच्याकडून खूप सकारात्मक उर्जा घेऊन आता मी कामाला लागणार आहे.”

शुभंकर तावडेचे ‘8 दोन 75’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फोर ब्लाइंड मेन’ हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

 

Recommended

Loading...
Share