विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू', कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौघुले हे नाव घराघरांत पोहचलं, पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे समीर चौगुले रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. त्यांच्या या यशाचा मागे त्यांच्या सहचारिणीचा खुप मोठा वाटा आहे. म्हणूनच आज लग्नाच्या 24 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.
समीर चौघुले लिहतात, " सह जीवनाची 24 वर्षे ..स्ट्रगलच्या काळात "मी आहे नको काळजी करुस" असं खंबीरपणे म्हणणारी आणि किंचित यशाने हुरळून जाऊन माझी पतंग हवेत उडायला लागल्यावर "जरा थांब" म्हणून मला जमिनीवर उतरवणारी....A Big Thank You आणि खूप प्रेम"
महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट समीर चौघुले यांच्यावर सेलिब्रटी आणि चाहत्यांकडून कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.