लॉकडाऊनमध्ये सगळेच लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यात मराठी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अशीच एक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर 'मनिषा केळकर'ने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफोरमेशन केलं आहे. यात मनिषाला तिचा फिटनेस कोच व आहारतज्ञ 'अक्षय कदम' याने साथ दिली. तिने नुकताच बॉडी ट्रान्सफोरमेशनचा व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला भरघोस प्रतिसाद दिला आहे.
आजवर मनिषा केळकरने 'ह्यांचा काही नेम नाही', 'मिशन पॉसिबल', 'चंद्रकोर', 'वंशवेल' असे मराठी सिनेमे केलेत तर 'लॉटरी' आणि 'बंदूक' या हिंदी सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. मराठी आणि हिंदी सिनेमांव्यतिरीक्त मनिषाने अनेक कार्यक्रमात निवेदनही केले आहे. त्यानंतर २०१८ मध्ये मनिषाने फॉर्म्युला फोर कार रेसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या ध्येयाकडे वाटचाल केली.
अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर 'मनिषा केळकर' तिच्या बॉडी ट्रान्सफोरमेशन विषयी सांगते, ''लॉकडाऊनपूर्वी माझा कार अपघात झाला. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की मी आता कार रेसींग करू शकणार नाही. परंतु मी उपचारानंतर फिजीओ थेरपी सुरू केली आणि हळूहळू रिकव्हर झाले. त्यानंतर काही महिन्यांनी मी फिटनेस कोच व न्यूट्रीशनीस्ट अक्षय कदम यांच्या सहाय्याने वर्कआऊट करण्यास सुरूवात केली. मी मोटर स्पोर्ट सुरू केलं तेव्हा मला खूपच अशक्तपणा जाणवत होता. परंतु वर्कआऊटमुळे माझ्यातील मस्सल पावर, स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. आणि रेसींगसाठी ते फार महत्त्वाचं असतं. त्या कार अपघातामुळे मी फार खचून गेलेले. परंतु व्यायाम, पौष्टीक डायट व सातत्य यामुळे मी आता पुन्हा एकदा अभिनय आणि कार रेसींग करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे."
मनिषाच्या ट्रेनिंगबाबत फिटनेस कोच अक्षय कदम सांगतो, " मला अजूनही मनिषा यांच्या वर्कआऊटचा पहिला दिवस आठवतोय. त्यांना बेसीक स्टेप करताना सुद्धा फार त्रास व्हायचा. पुशअप्स, स्क्वॅट्स, डेडलीफ्ट करता येत नव्हत्या. परंतु आता त्या पुशअप्स, स्क्वॅट्स, डेडलीफ्ट सहजरीत्या करतात. तसेच पाच महिन्यांपूर्वी आम्ही १ किलोच्या डंबेल्सने वर्कआऊट करायला सुरूवात केलेली आणि आता त्या ५० किलोची डेडलीफ्ट सहजपणे करतात. त्यांच्यासाठी बॉडी ट्रान्सफोरमेशनचा हा संपूर्ण प्रवास सोप्पा नव्हता. परंतु अभिनय आणि रेसींग कारचं स्वप्न जिद्दीने पाहणा-या मनिषा यांनी ते करून दाखवलं."