By  
on  

शिवा काशीदच नव्हे तर या भूमिकांमध्येही झळकला अभिनेता स्तवन शिंदे

स्वराज्यस्थापनेसाठी आजवर हजारो शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा वीरमरण आलेल्या शिलेदारांचे करावे तितके कौतुक कमीच. याच शिलेदारांच्या शौर्यकथेतील आणि स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाचं पान म्हणजे शिवा काशीद. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळत असून हे पात्र अभिनेता स्तवन शिंदे साकारत आहे. या मालिकेत स्तवनने शिवा काशीदच नव्हे तर आणखी तीन भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केले. 

चतुरस्त्र भूमिका साकारत स्तवन या मालिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. शिवा काशीद या मालिकेतील मुख्य भूमिकेसह तो अभिनेते अजिंक्य देव साकारत असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांची मिमिक्री करताना दिसणार आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगडावर असताना पडलेल्या वेढ्याला प्रतिउत्तर देण्यासाठी त्याने शौकीद काशीद नावाची भूमिका या मालिकेत साकारली. पन्हाळगडावरुन शिवरायांची सुटका करण्यासाठी शिवरायांचे प्रतिबिंब म्हटले जाणाऱ्या शिवा काशीदने शिवरायांचे वेषांतर करून शत्रूंची दिशाभूल करून राजांचा जीव वाचवणार्या पात्राची जबाबदारीही स्तवनने या मालिकेत उत्तमरीत्या पेलवली. एका महिन्यात चित्रीत झालेल्या या चारही भूमिकांचे प्रसारण मालिकेत सुरू आहे. 

या चतुरस्त्र भूमिकांबद्दल बोलताना स्तवन असे म्हणाला की, "पुन्हा एकदा चॅनेलसोबत जोडलो गेल्याचा मला खूप आनंद आहे. मालिकेत शिवा काशीद यांच्या मुख्य भूमिकेनंतर मी आणखी तीन भूमिका एकाच वेळी साकारल्या आहेत, खरतरं एकाच वेळी चार भूमिका साकारणं माझ्यासाठी टास्कच होता, मात्र माझी दिग्दर्शक टीम, प्रॉडक्शन, इतर कलाकार मंडळी आणि माझा प्रेक्षक वर्ग यांच्या सपोर्टमुळे या चारही भूमिका मी उत्तमरीत्या साकारल्या. दरम्यान अजिंक्य सरांसोबतचे माझे नाते घट्ट होत गेले.

 

त्यांच्याकडून बरेच काही नव्याने शिकायला मिळाले. या ऐतिहासिक मालिकेत साकारायला मिळालेल्या भूमिका हे माझे भाग्यच समजतो".  छोट्या पडदयावर हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्तवन 'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या एकाच मालिकेतील वेगवेगळ्या भूमिका साकारतानाचा स्तवन प्रेक्षकांना पाहणे रंजक ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive