दिग्दर्शक समीर विद्वांस सोशल मिडियावर अनेकदा विविध विषयांवर मतप्रदर्शन करत असतात. आताही त्यांनी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जवळपास दीड वर्षांनी आता मराठी सिनेमे थिएटरवर रिलीज होण्यास सुरुवात झाली आहे. याच संदर्भात समीर विद्वांस यांनी ट्वीट केलं आहे.
हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून..
सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी..
pic.twitter.com/G2XuW8vpWZ— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) November 18, 2021
आपल्या पोस्टमध्ये समीर म्हणतात, ‘गेलं दीड वर्षे सगळ्यांसाठीच आर्थिक गणित कोलमडून टाकणारं गेलंय, अजूनही जातंय. मनोरंजन क्षेत्रही यातून सुटलं नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडतायत. करोडोची गुंतवणूक २ वर्षे अडकून आहे. त्यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे आणि आत्ता कुठे गाडी यार्डातून बाहेर येत आहे.
पण ती नीट रुळावर आणणं पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या हातात आहे. एकीकडे हिंदीचे १५० कोटी पार आकडे बघताना मनापासून वाटतं की असाच भरघोस हाऊसफूल प्रतिसाद मराठी चित्रपटांनाही मिळावा! ते चित्र बघायला आणि अनुभव घ्यायला आम्ही सर्व कलाकार मंडळी आसूसलोय!’
‘खरंच! पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मराठी चित्रपटही प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन पाहतील. तसं घडलं तर ते तुफान हाऊसफूल दिवस दूर नाहीत. खरच सांगतो आमच्या कलाकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी चित्रपट शक्य तितके चित्रपटगृहात जाऊनच बघा. नाही आवडले तर तसं मोकळेपणाने सांगाच, तो तुमचा हक्कंच आहे.
पण तुम्ही जर भरभरुन प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपली मराठी चित्रपटसृष्टी परत एकदा हळूहळू रांगायला.. चालायला आणि मग धावायला लागेल. याच बरोबर राज्यसरकारलाही विनंती आहे. बाकी सगळं अगदी नीट व्यवस्थीत सुरु झालंय तर मग चित्रपट आणि नाट्यगृहही पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरु करण्यात यावीत.’
हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून.. सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी.. हे कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.