मराठी हिंदी मालिका तसेच मराठी व हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.
माधवी गोगटे यांचे नाटकातले सहकलाकार आणि प्रसिध्द कलाकार प्रशांत दामले यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिती आहे. प्रशांत दामले लिहतात, "सौ माधवी गोगटे... माझी आवडती सहकलाकार...गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली... जवळ जवळ 2500 प्रयोगात आम्ही एकत्र काम केल. अतिशय मनमिळावू, उत्तम खणखणीत आवाज, विनोदाचे उत्तम टाईमिंग आणि उत्तम स्वभाव.. नंतर ती हिंदी सीरिअल मधे खुप बिझी झाली पण मराठी नाटकाची नाळ तुटू दिली नाही. अश्या माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलवून घेतल. अवेळी..
हे खुप दुखदायक आहे . ॐ शांती"