By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी सांगते, 'हे वर्ष माझ्यासाठी ठरु शकतं गेम चेंजर'

अभिनेत्री, कवयित्री, नृत्यांगना, सुत्रसंचालिका अशी आपली वैविध्यपूर्ण ओळख प्राजक्ता माळीने निर्माण केली आहे. 2022 ह्या वर्षी प्राजक्ता आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. निर्माती बनण्यासाठी ती जेवढी झटून काम करत आहे,तेवढीच सध्या ती आपल्या एक्टिंग प्रोजेक्टसाठीही उत्सुक आहे.

प्राजक्ताच्या यंदा 4 नव्या कलाकृती रसिकांसमोर येतील. लकडाऊन, पावनखिंड,चंद्रमुखी हे सिनेमे आणि रानबाजार ही वेबसीरिज यंदा रिलीज होणार आहे. लकडाऊन चित्रपटातून ती पहिल्यांदाच सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर पावनखिंड मधून युध्दपटाचा भाग होण्याची संधी तिला पहिल्यांदाच मिळालीय. चंद्रमुखी सिनेमातून पहिल्यांदाच ती सुप्रसिध्द संगीत-दिग्दर्शक अजय-अतूलच्या गाण्यावर नाचताना दिसणार आहे. तर रानबाजार ह्या वेबसीरिजमधून ती पहिल्यांदाच वेश्याव्यवसायातील एका स्त्रीची भूमिका रंगवताना दिसेल. रानबाजार वेबसीरिजने प्राजक्ताचं ओटीटीविश्वात पदार्पण होतंय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्या 2022 च्या ‘पहिल्या-वहिल्या’ योगांबद्दल म्हणते, “2022 माझ्या बकेटलिस्ट मधली अनेक स्वप्न पूर्ण करणार असंच दिसतंय. 2013 पासून मी अभिनय क्षेत्रात आहे. पण अंकुशदादासोबत सिल्वर स्क्रीन शेअर करताना, यंदा तुम्ही मला पहिल्यांदाच पाहाल. लकडाऊनमध्ये मी आजच्या काळातल्या मुलीच्या भूमिकेत दिसेन तर त्यानंतर रिलीज होणा-या पावनखिंड सिनेमातून श्रीमंत भवानीबाई बांदल ह्या एका कुलीन राणीच्या भुमिकेत दिसेन. तर त्या अगदी विरूध्द भूमिकेत अर्वाच्य  शिव्या देताना मी रानबाजारमध्ये दिसेन. अभिनेत्री म्हणून चाकोरीबाहेरील आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा रंगवाव्यात, असं नेहमीच वाटत होतं. यंदा ती इच्छा पूर्ण होतेय.”

प्राजक्ता पूढे सांगते, “माझ्या बकेटलिस्ट मधल्या अजून दोन गोष्टी यंदा होणार आहेत. अजय-अतुल ह्यांच्या संगीताची मी चाहती आहे. त्यांच्या एखाद्या गाण्यावर आपल्याला डान्स करायला मिळावा, असं मला गेली काही वर्ष वाटतं होतं. ही माझी इच्छा यंदा चंद्रमुखी सिनेमातून पूर्ण होतेय. आणि दुसरं म्हणजे, निर्माती होण्याचं स्वप्न. माझ्या शिवोहम प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग लवकरच सुरू होतंय..”

2021 मध्ये रिलीज झालेल्या पांडू सिनेमात प्राजक्ता नकारात्मक भूमिकेतून दिसून आली होती. ह्या सिनेमाचा सिक्वल बनण्याची शक्यता चित्रपटाच्या क्लायमॅक्समधून दिसून आलीय. ह्या विषयी प्राजक्ता म्हणते,”सोज्वळ चेहरा असल्याने माझ्याकडून नकारात्मक भूमिकेची अपेक्षा कोणी केली नव्हती.पण हा चित्रपट रिलीज झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रियांमधून ही भूमिका त्यांना आवडतेय, हे लक्षात आलं. आता सिक्वलविषयी अद्याप मला माहित नाही. पण पांडू-2 बनला आणि माझी त्यात भूमिका त्यात असेल,तर मला नक्कीच आवडेल. सध्यातरी मी एवढंच म्हणेन की, हे वर्ष माझ्यासाठी गेमचेंजर ठरू शकतं.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive