मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रमेश देव यांच्यावरउद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, मुलगा अजिंक्य देव व दिग्दर्शक मुलगा अभिनय देव, सुना नातवंड असा परिवार आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ते हिंदीतलेसुध्दा मोठे अभिनेते म्हणून नावाजले जायचे. पत्नी सीमा देव यांच्या सोबत सिनेमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावली.
सुवासिनी, पुढचं पाऊल, पाठलाग, जगातल्या पाठीवर .. अशा असंख्य चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. असा देव पुन्हा होणे नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
२०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ असे त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.