By  
on  

अमृता खानविलकर, सायली संजीव आणि हार्दिक जोशी 'हर हर महादेव' मध्ये साकारतायत ही भूमिका

झी स्टुडिओज निर्मित 'हर हर महादेव' चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटातील अजून एक अत्यंत महत्वाचे आणि ताकदीचे पात्र म्हणजे सोनाबाई देशपांडे यांचे. सोनाबाईंची भूमिका कोण साकारणार हे गुपित आता उघड झाले आहे. ज्यांच्या नावाने बारा मावळ दणाणतात, असे बाजीप्रभू देशपांडे आणि ज्यांच्या नावाने बाजीप्रभू देशपांडे दणाणतात अशा सोनाबाई आहेत. 

  फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कर्तृत्वशैलीने नाव कमावणारी बहुगुणी अभिनेत्री अमृता खानविलकर खंबीर सोनाबाईंची भूमिका साकारणार आहे. 'हर हर महादेव' हा अमृताचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. अमृताने अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. दिलखेचक अदांनी घायाळ करणारी भूमिका असो किंवा नृत्य अमृता नेहमीच चर्चेत राहिली आहे. आपण अमृताला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. यावेळेस ती करारी अशा सोनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मावळ मधील स्त्रियांचा अभिमान म्हणजे सोनाबाई. प्रेमळ तरी वेळ पडता पतीचा कान पिळणाऱ्या अशा सोनाबाईंची भूमिका निभावणं काही सोपं नाही. अशा एका वेगळ्या भूमिकेत अमृताला पाहाण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी 'महाराणी सईबाई भोसले' यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीवची वर्णी लागली आहे. सिनेमातील सायलीचा पहिला लुक समोर आला आहे. हर हर महादेवच्या निमित्तानं सायली देखील पहिल्यांदा ऐतिहासिक सिनेमात काम करणार आहे. 

हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. त्याने या मालिकेत राणा ही पैलवानाची भूमिका साकारली होती. आता तो  'हर हर महादेव' या चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात हार्दिक आबाजी विश्वनाथ ही  भूमिका साकारणार आहे. त्याच्या या चित्रपटातील लुक चर्चेत  आहे.

हार्दिक जोशीने या चित्रपटातील त्याच्या लुकचे पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत लिहिले आहे कि, ''स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणजे आबाजी विश्वनाथ. त्यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते हार्दिक जोशी. स्वराज्याचा शिवमंत्र येत्या दिवाळीत संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार.''

 

भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स'ची आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला 'हर हर महादेव' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive