आज देशभर बालदिनाच्या उत्साह पाहायला मिळतोय. करोना काळाच्या तब्बल दोन वर्षांनंतर शाळांमधून, विविध संस्थांमधून, कार्यक्रमांच्या माध्यमांतून बालदिनाचा जल्लोष सुरु आहे. सोशल मिडीयावरसुध्दा सेलिब्रिटी बालपणीचे फोटो पोस्ट करत बालदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. पण या सर्वांत एक पोस्ट लक्षवेधी ठरतेय ती म्हणजे आई कुठे काय करतेमध्ये अनिरुध्दची भूमिका साकारणारे प्रसिध्द अभिनेते मिलींद गवळी यांची. या पोस्टमध्ये त्यांनी लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंतर आपल्यासाठी रोजच बाल दिन असायला हवा, खरंच लहान मुलांमुळे, जग सुंदर आहे, आपल्या सगळ्यांचे जीवन सुंदर आहे, आणि लहान मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला प्रामाणिक कष्ट करायला हवेत, निसर्गाची, पर्यावरणाची, आपल्या या पृथ्वीची, आज आपण काळजी घेतली तर भविष्यामध्ये त्यांना एक सुंदर जग जगायला मिळेल.
मुलांना जन्माला घालायच्या आधी त्यांच्या आरोग्याची , त्यांच्या शिक्षणाची , त्यांच्या भविष्याची काळजी घेता येत असेल तरच मुलांना जन्माला घालावे, कारण ज्या वेळेला आपण बाल मजूर बघतो, आपण लहान बाळं भीक मागताना बघतो, रस्त्याच्या कडेला घाणीत जगताना बघतो, त्यावेळेला मनाला खूप दुःख होतं , आपण किती असाह्य आहोत, आपल्याला माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाही आहोत असं वाटायला लागतं. असं नाही होऊ शकत का
जगामध्ये कुठलंही लहान मूल उपाशी राहता कामा नये , मग तो आफ्रिकेतला असो अमेरिकेतला असो किंवा भारतातला असो, असं होऊ शकत का , की प्रत्येक बालकाला शिक्षण , आरोग्य हे सगळं तो मोठा होईपर्यंत , त्याला सहज मिळू शकेल, सगळ्याच मुलांना समान शिक्षण नाही का मिळू शकत, लाखो रुपये फी घेतलेल्या शाळांमध्ये वेगळे शिक्षण आणि गावाखेड्यातल्या पाड्यांमध्ये वेगळे शिक्षण, मुनसीपांटी च्या शाळांमध्ये वेगळे शिक्षण ..असं का…? असा बालदिन येईल का? जगातली सगळीच बाळं सारखी , त्यांना सगळंच सारखं.. डॉ. एपीजे अबदुल कलाम सर हे स्वप्न पहात होते…, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.