'आई कुठे काय करते' मधील संजना फेम रुपाली भोसले रुग्णालयात दाखल

By  
on  

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. संजनाच्या व्यक्तिरेखेतील अभिनेत्री रुपाली भोसले हिचासुध्दा खुप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या चाहत्यांसाठी थोडी काळजीत पाडणारी एक पोस्ट रुपालीने शेयर केलीय.   रुपालीवर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे ती इस्पितळात भरती झाली आहे. तिने तिचे इस्पितळातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या हाताला सलाइन लावण्यासाठी आयव्ही लावलेली दिसतेय. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आपल्या शरीराची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

रुपालीने पोस्ट करत लिहिलं, 'स्वतःची काळजी घेणं हा इतरांची काळजी घेण्याइतकाच एक आवश्यक भाग आहे. झाड जितकं निरोगी तितकं चांगलं फळ देऊ शकते. काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली पण आता मी बरी आहे आणि माझी तब्येत सुधारत आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. बर्‍याच वेळा आपण आपल्या शरीरात जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याची ही प्रवृत्ती असते. जर वेदना फार जास्त नसेल तर आपल्याला असं वाटतं की जोपर्यंत ती गंभीर गोष्ट बनत नाही तोपर्यंत ती महत्वाची नाही. पण मी सर्वांना नम्रपणे विनंती करते की वेदना होत असेल तर फार काळ वाट पाहू नका. कृपया डॉक्टरांना त्वरित भेटा. तुमचं शरीर आणि स्वतःला गृहीत धरू नका.'

 

रुपालीच्या चाहत्यांनी तिच्यासाठी तू लवकर बरी हो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. 

Recommended

Loading...
Share