सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. विक्रम गोखले यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या, विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले याही अभिनेत्री होत्या आणि विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेते होते. असा तीन पिढ्यांकडून विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा लाभला होता. गेली सात दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.