अभिनेता विराट मडके एका वेगळ्या रावडी लूकमध्ये दिसून येत आहे. आत्तापर्यंत विराटने साकारलेल्या भूमिकेपेक्षा एकदम विरोधाभास असणारी भूमिका आणि त्याप्रमाणे त्यातला हा त्याचा लूक दिसून येत आहे. ‘केसरी या सिनेमातून पदार्पण केलेल्या विराटने गेल्या काही वर्षात विराट मडकेने वेगळ्या धाटणीचे सिनेमा केले आहेत. त्यामध्ये सोयरिक आणि आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांचा समावेश आहे.
आता आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेतील त्याचा लूक समोर आला आहे. विराट मडकेचा आज वाढदिवस त्या निमित्त त्याचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित केले.
हातात बंदूक आणि डेंजर लूक असं विराटचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं आहे. या भूमिकेबद्दल विराट सांगतो, ‘’हा सिनेमा माझ्यासाठी चॅलेंजिंग होता. मानसिकदृष्ट्या आणि शारीरकदृष्ट्याही हा सिनेमा करणं आव्हान होतं. या भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास केला. चॅलेंजिंग लोकेशन्स आणि एक्शन सीन्स यामुळे हा सिनेमा करताना मजा आली. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना ही भूमिका नक्की आवडेल.’’
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीची निर्मीती असलेला हा सिनेमा मराठी - कन्नड भाषेत शूट झाला आहे. सदागरा राघवेंद्र यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘’पॅन इंडिया सिनेमा आणि दोन भाषेतील शूटिंग त्यामुळे या सिनेमासाठी मी कन्नडाही थोड्या प्रमाणात शिकलो. त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर केलेले शूट, तिथल्या लोकांसोबत काम करणं हा सगळा अनुभवही भन्नाट होता. सर्व टीममध्ये काही दिवसांतच मैत्रीही झाली होती. ”
दिपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय शेट्टी यांनी केली आहे. या सिनेमात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा २०२३ मध्ये भेटीला येईल.