छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार पाहायला मिळणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी एका मोठ्या सोहळ्यात झाली. वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भूमिकेसाठी अक्षयकडे विचारणा केल्याचं अक्षयनेच खुद्द जाहीर केलं होतं. राज ठाकरेंच्या मते अक्षयचं महारांची भूमिका उत्तम साकारु शकतो, असंही ते म्हणाले होते. ’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.अखेर या सिनेमाच्या शूटींगचा श्रीगणेशा अक्षयने केला आहे. या सिनेमाच्या सेटवरचा महाराजांच्या रुपातला अक्षयचा फर्स्ट लुक नुकताच उलगडला आहे.
अक्षयने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहीलं, “आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करत आहे. या चित्रपटात मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सकारणार आहे. ही भूमिका माझ्या वाट्याला येणं हे माझं भाग्य आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादाने मी ही भूमिका साकारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहुदेत.”
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.