By  
on  

'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने पूर्ण झाले 'पैठणी' जिंकण्याचे स्वप्न

सध्या महाराष्ट्रभर 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची चर्चा रंगली असून चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी 'गोष्ट एका पैठणीची'च्या खास शोजचे आयोजनही करण्यात येत आहे. पुण्यामध्ये नुकताच क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठानच्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या वतीने 'गोष्ट एका पैठणीची'चा खास शो आयोजित करण्यात आला होता. या खास शोसाठी चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, पुष्कर श्रोत्री यांचीदेखील उपस्थिती होती. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांसाठी यावेळी 'गोष्ट एका पैठणीची'च्या टीमने लकी ड्रॉचे आयोजन केले होते. या लकी ड्रॅामध्ये नशीबवान विजेत्या ठरल्या अलका मेमाणे. अलका यांना रुपाली ताईंच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली. 

पैठणी जिंकल्यानंतर अलका मेमाणे यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. अलका मेमाणे म्हणाल्या " मी १९८७ पासून शिवणकाम, फॉल बिडिंगचे काम करत आहे. शिवणकाम करताना माझ्याकडे अनेक पैठण्या आल्या. पैठणीवर काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याला लहान बाळासारख जपावे लागते. चित्रपट बघताना ही माझीच गोष्ट आहे, असे मला वाटत होते. चित्रपटात जसा इंद्रायणीच्या कुटुंबाचा तिला पाठिंबा होता तसाच माझ्या कुटुंबाचा देखील आहे. जेव्हा रुपाली ताईंनी माझे नाव जाहीर केले तेव्हा क्षणभर माझी खात्रीच पटली नाही. 


माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. माझ्या ध्यानीमनीही नव्हते की इथे येऊन मी भाग्यवान विजेती ठरेन." 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " प्रत्येक स्रिचे काही ना काही स्वप्न असते. 'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लकी ड्रॉद्वारे स्पर्धेतील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यात देखील रुपालीताईंच्या वतीने आम्ही चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. यावेळी महिला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. लकी ड्रॉची भाग्यवान विजेती घोषित केल्यानंतर अलका मेमाणे यांच्या रूपात आम्हाला खऱ्या आयुष्यातील इंद्रायणी भेटली. पैठणी जिंकल्यानंतर त्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर झळकत होता आणि हा आमच्यासाठीही तितकाच आनंदाचा क्षण होता.’’

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive