बिग बॉस महेश मांजरेकर हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्यावर्षी घडलेल्या एका अपघातातील प्रकरणाामुळे त्यांना आता मोठ्या चौकशीला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहे. आधीच वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक सिनेमाच्या घोषणेमुळे आणि यातील कलाकारांच्या निवडीमुळे ते चर्चेत होतेच आता हा नवा वाद उभा राहिला आहे. आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात केलंलं वक्तव्य महेश मांजरेकर यांना भोवण्याची शक्यता आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा दुसऱ्या गाडीसोबत अपघात झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी आश्रमशाळेचे संस्थाचालकाविरोधात बदनामी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याबाबत टेभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना मांजरेकरांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. मागील वर्षी 2021 साली हा अपघात झाला होता. त्यावेळी मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांचे बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. सातपुते यांनी मांजरेकर यांच्याविरुध्द टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.