मनोरंजनविश्वात आपल्या विविध कामांचा ठसा उमटविणा-या प्रत्येक कलाकाराचा त्याच्या कार्यानुसार गौरव व्हावा ही इच्छा असते. सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून चमकणा-या कलाकारांचा त्यांच्या भूमिकेचा योग्य गौरव होतो. संगीतकार, दिग्दर्शक आणि गायकाचाही होतो. परंतु लेखक व गीतकाराला फारसं विचारलं जात नसल्याची खंत मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनने कवितेतून मांडली आहे.
क्षितीजच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. क्षितीज कवितेतून म्हणाला, “महाराष्ट्राल फेवरेट गायक आहे, गायिका आहे, संगीतकार आहे, गीतकार नाही. महाराष्ट्राला फेवरेट चित्रपट आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक नाही. गाण्यातून शब्द काढून बघा, सिनेमातून संवाद काढून बघा, आणि सांगा ते फेवरेट होतील का? लेखक आणि गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर महाराष्ट्राचे कसे होणार?”
पुढे तो म्हणाला, “काय वाटतं तुम्हाला? अजून दोन कॅटेगरी वाढवून लेखक आणि गीतकार यांनाही तितकंच मानाचं स्थान दिलं तर…” . दरम्यान झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२२’चा नामांकन सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे क्षितिजचा हा टोला यांनाच होता का असा सवाल उपस्थित होतोय.