सरला एक कोटी... या नावातच वेगळेपण आहे. नावावरून हा चित्रपट काय असेल, कसा असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही... या चित्रपटाचं नावंच इतकं भन्नाट आहे तर, यातील कलाकार किती हटके असतील? नुकतंच या चित्रपटातील मुख्य कलाकार ओंकार भोजनेचं पोस्टर रिलीज झालं आणि क्षणात सगळीकडे व्हायरल झालं. यानंतर चित्रपटाच्या नावावरून त्यातली सरला नक्की कोण असे प्रश्न विचारले जात होते, वेगवेगळे अंदाज बांधले जात होते, अशातच आज सरला कोण आहे हे गुपित उलगडलंय...
‘देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साता जन्माचे वचन दिलंय’ अशी टॅगलाईन असलेलं सरलाचं पोस्टर आज सर्वांसमोर आलंय आणि ही सरला म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री ईशा केसकर आहे. कायम बबली, क्यूट गर्लवाल्या भूमिका साकारणारी ईशा या चित्रपटात ग्रामीण बाजातील लूकमध्ये दिसत आहे. गावाकडच्या स्वयंपाकघरात एका करारनाम्यावर पाठमोरी बसलेली सरला या पोस्टरमध्ये दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर काहीसे गूढ भाव आहेत. सरला कोण आहे हे कोडं उलगडलं असलं तरी चित्रपटाचा विषय अजूनही गुपितच आहे. तर अजून एक विशेष असं की या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावाखाली ‘सत्य घटनांवरून प्रेरीत’ असं नमूद करण्यात आलंय, त्यामुळे चित्रपट नक्की कशावर बेतलेला असेल याचा अंदाज चाहते आता लावत आहेत. ओंकार आणि ईशाची ही जोडी ‘सरला एक कोटी’मध्ये काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.